नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘वडिलांच्या लहान बहिणाचा नवरा आणि वडिलांच्या मोठ्या बहिणाचा नवरा’ या संकल्पनेसाठी मामा, मामाजी, फुफा, फुपा, फुआ, फुवा, फोफा, फुफाजी, फफा, फुप्पा, काका, आतेयमामा, आतोबा, आत्तोबा, आतेमामा, आत्तो, आतो, आतोयी, आतव्या, आतोइ, आतुई, आत्तुई, आतुबा, फियाजी, फिया, फुया, फुआजी, फुओ, फुवो, मावळा, मावळ, मामास, आत्याजी, अत्यांजी, अत्त्याजी, भाऊजी, भाओजी, अंकल, काकापाय, मावसा, मावसो, नंदवीस, नंदई, काकुस, मामांजी, भाईजान, तिवाय, आतवा, धाकोस, चुलता, भाटवा, मामोई, बुवामामा, इत्यादी शब्द सापडतात. हे शब्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वापरले जातात. ह्यामध्ये सर्व ध्वनी वैविध्यानुसार पुढीलप्रमाणे शब्द वापरले आहेत. भौगोलिक वैविध्यानुसार कोकण पट्ट्यातील आदिवासी तसेच धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार मधील आदिवासी समाजातील वारली, महादेव कोळी, बंजारा, मांगेली, ठाकूर जातींमध्ये आणि महाराष्ट्रातील मुस्लीम समाजात फुफा, भाईजान, फुपा, फुओ,फियाजी, फुआजी हे वैविध्य आढळून येते. काकापाय हा शब्द ख्रिश्चन समाजात आढळून येतो. मावळा हा शब्द काही प्रमाणात मराठा समाजात तर क्वचितच कोळी, महार आणि तेली समाजात आढळून येतो. विदर्भात मामाजी, काकाजी, आतोयी, फियाजी मामांजी असे आदरार्थी शब्द आढळून येतात. आत्तुई हा वर्धा, अमरावती, वाशीम, अकोला मध्ये कुणबी, मांग या समाजात आढळून येतो. आतोई बौद्ध समाजात आढळून येतो. भाटवा हा शब्द नागपूर मधील कुणबी समाजात आढळला आहे.